टेंभुर्णी तासभर पाऊस : आठवडी बाजारात व्यापारी हैराण: पेरण्या लांबणीवर
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
टेंभुर्णी, येथील आठवडी बाजारामध्ये दुपारी आलेल्या पावसाने व्यापारी हैराण झाले अचानक जोराचा पाऊस सुरू झाल्याने बाजारातील गल्लीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. बाजारातील सर्वच गल्ल्यातून पाणी वाहत असल्याने भाजीपाला व इतर साहित्य विक्रेत्यांची धांदल उडाली. पावसापासून बाजारातील साहित्य भिजू नये म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ताडपत्री कापड मालांवर टाकले दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच लागवड झालेल्या पिकाला या पावसाने जीवदान मिळाले आहे. परिसरात अजूनही पेरण्या बाकी असल्याने शेतकऱ्यांची बाजारात खरेदीसाठी लगबग दिसली. दरम्यान मंगळवारी ही परिसरात पाऊस झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची ठिकठिकाणी लागवड केली आहे परंतु सोयाबीन व इतर कडधान्य पिकांसह मकाची लागवड लांबणीवर पडली आहे मंगळवारी दुपारीही परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पेरणीसाठी वाफसा झाली नाही परिणामी पेरणी लांबणीवर पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खतांच्या दरात प्रचंड वाढ खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल झाले असून प्रत्येक खताच्या बॅग मागे शंभर ते दीडशे रुपये दरवाढ झाली आहे यामुळे जे शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी खत भरणा केलेला आहे त्यांना हा आर्थिक भुर्दंड बसत नाही दरम्यान सद्यस्थितीत रासायनिक खते खरेदी करणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.


