उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
उरण पोलीस ठाणे हद्दीतील जांभुळपाडा, जासई येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसम करण लक्ष्मण सिंग याचा सायन हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन उरण पोलिसांनी केले आहे. पोलीस ठाणे उरण येथे अकस्मात मृत्यु रजि. नं. २१/२०२६ भा.ना.सु. संहिता कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर देणार पंढरीनाथ वामन पाटील, वय ५२, रा. वंशेणी, ता. उरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत करण लक्ष्मण सिंग याला १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास राहत्या गावाजवळ चक्कर येऊन तो पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीने यमुनाबाई रुग्णालय, चिर्ले येथे प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मनपा हॉस्पिटल, वाशी येथे हलवण्याचा सल्ला दिला. वाशीत उपचार घेतल्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० वाजता त्याला सायन हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले. सायन हॉस्पिटलच्या वॉर्ड नं. ०५ मध्ये त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना १९ मार्च २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजता कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताचे वय अंदाजे ४३ वर्षे, उंची ५ फूट ४ इंच, केस काळे-पांढरे असून तो फिरस्ता होता व जांभुळपाडा, जासई येथे राहत होता. या प्रकरणाचा तपास पोहवा सचिन दत्तात्रेय पाटील करत असून दाखल अधिकारी सपोनि सतिश गोरे आहेत. मयताच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने उरण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, करण लक्ष्मण सिंग याच्या नातेवाईकांबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी उरण पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ९५५२५९८९७७७ किंवा तपास अधिकारी पोहवा सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधावा.सदर व्यक्तीचे मार्च मध्ये निधन झाले तरी त्याच्या नातेवाईकांचा अजूनही शोध लागला नाही म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांनी सहकार्य करावे, अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांच्या मार्फत करण्यात आली आहे.




