पनवेलमध्ये ब्रह्माकुमारीज तर्फे ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
पनवेल येथील ब्रह्मा कुमारीस केंद्रात २४, २५ व २६ एप्रिल २०२६ दरम्यान सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात पार पडला. या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी शिबिराची सुरुवात झाली.बीके दिशा देवकर बहन यांनी मुलांकडून व्यायाम करून घेत केली. त्यानंतर बीके डॉ. अंजली सुंकले बहन यांनी “डिजिटल डिटॉक्स” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांकडून एक खेळ करून घेतला, ज्यातून मोबाईल गेम्सपेक्षा शारीरिक हालचालींचे महत्त्व पटवून दिले. तसेच मुलांकडून डिजिटल डिटॉक्सची प्रतिज्ञा करून घेतली व पालकांनाही मार्गदर्शन केले. पुढे बीके सुलक्षणा बहन यांनी “मी कोण?” या विषयावर आत्म्याचे स्वरूप समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी बीके तारा दिदी व सेवाधारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिवसाची सुरुवात झाली. बीके पल्लवी बहन यांनी मुलांकडून झुंबा डान्स करून घेतला. त्यानंतर बीके सुनंदा दिदींनी परमात्म्याचा परिचय करून दिला. बीके अनिता दिदींनी राजयोग मेडिटेशनची माहिती देत त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. पुढे बीके दिशा तिवारी बहन यांनी मुलांना विविध विषयांवर चित्रकला करण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलांकडून व्हॅल्यू-बेस्ड गेम्स खेळवण्यात आले आणि शेवटी सर्वांना प्रसाद देण्यात आला. तिसरा दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी व्यायामाने सुरुवात झाली. बीके सुनंदा दिदींनी चार युगांची माहिती गाणे व नृत्याच्या माध्यमातून दिली. बीके डॉ. विजय भाई यांनी हेल्दी लाईफस्टाइलवर मार्गदर्शन करत दिवसाची योग्य दिनचर्या कशी असावी हे सांगितले. मुलांसाठी भावनांवर आधारित एक खेळ आयोजित करण्यात आला. त्यानंतर आत्म्याच्या सात गुणांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी पनवेल ब्रह्माकुमारीज सेंटरच्या इंचार्ज बीके तारा दिदी यांच्या हस्ते दररोज काढलेल्या लकी ड्रॉमधून तीन मुलांना बक्षिसे देण्यात आली. तसेच “शिवबाबा” कडून सकाळी उठल्यापासून शक्ती कशी घ्यावी, दिवसभराचा दिनचर्या चार्ट कसा सादर करावा आणि दिवसभर परमात्म्याची आठवण कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेतही तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली, तसेच सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुलांकडून “लेटर टू गॉड” लिहून घेण्यात आले आणि सर्वांना ब्रह्माकुमारीजचे आशीर्वाद देण्यात आले. बीके सुलक्षणा बहन यांनी मुलांकडून राजयोग मेडिटेशन करून घेतले, तर संजय भाई यांनी प्रेरणादायी कविता सादर केली.अशा प्रकारे पनवेल ब्रह्माकुमारीज केंद्राचा किड्स समर कॅम्प आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.


