टेंभुर्णी येथे २२ वर्षीय तरुण दुर्गेश बनकरची गळफास घेऊन आत्महत्या; बनकर कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर,परिसरात हळहळ

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.30
येथील दत्त जिनिंग परिसरामध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. दुर्गेश विष्णू बनकर असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. ऐन उभारीच्या वयात तरुण मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या वयातील मुलांच्या अशा अचानक जाण्याने अनेक माता-पित्यांच्या मनातील चिंता अधिकच वाढली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बनकर कुटुंब हे मूळचे देऊळगाव राजा येथील असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी टेंभुर्णी येथील दत्त जिनिंग जवळ नवीन घर बांधून तेथे वास्तव्यास सुरवात केली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना आणि संपूर्ण परिवार आनंदाने राहत असतानाच आज सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास दुर्गेशने राहत्या घरी गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
दुर्गेशच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच टेंभुर्णी परिसरातील तरुण वर्ग आणि नागरिकांनी सरकारी दवाखान्यामध्ये मोठी गर्दी केली होती. हसतखेळत राहणाऱ्या दुर्गेशने अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. “कोणाची नजर लागली कुणास ठाऊक,” अशी भावना याप्रसंगी उपस्थितांमधून व्यक्त होत होती.
मृत दुर्गेश याच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ, एक बहीण, काका, काकू असा मोठा आणि आप्तस्वकीय परिवार आहे. ऐन २४-२५ वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दुर्गेश यांच्या पार्थिवावर रात्री ठीक ९:३० वाजेच्या सुमारास गाडेगव्हाण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.



