जिजाऊ स्कूलमध्ये कृष्णजन्माचा जल्लोष; दहीहंडीने रंगला उत्सव
राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी वेधले लक्ष; सांस्कृतिक कार्यक्रमांना पालकांची उत्स्फूर्त दाद

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, जाफराबाद येथे गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालकांची लक्षणीय उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुयश भैय्या लहाने उपस्थित होते. गोकुळाष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या आकर्षक वेशभूषेत सहभाग घेतला. श्रीकृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्ण नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या निरागस अभिनयाने आणि उत्स्फूर्त सादरीकरणाने कार्यक्रमस्थळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. गोविंदा आला रे आलाच्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद देत त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मुख्याध्यापक योगेश शिंपी यांनी विद्यार्थ्यांना
गोकुळाष्टमीचे महत्त्व सांगितले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, मैत्री, एकोपा, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, असे त्यांनी मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेतील चिमुकले विद्यार्थी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख करून देतानाच सांस्कृतिक
मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

