जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी जवळून जवळच असलेल्या काळेगाव येथून अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; ८ टिप्पर व १ जेसीबी जप्त

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार अविनाश लोढे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५/०६/२०२६ रोजी रात्री जाफराबाद तालुक्यातील काळेगाव शिवारातील बोबडेवाडी परिसरात अवैध गौण खनिज वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ८ टिप्पर व १ जेसीबी मशीन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. जाफराबाद तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि प्रभावी कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सदर कारवाई महसूल विभाग व टेंभूर्णी तसेच जाफराबाद पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने केली. या पथकात ग्राम महसूल अधिकारी बी. जी. ब्राम्हणे, अंकुश सोनवणे, अरुण गावंडे, प्रभाकर शेणेवाड, अमोल मुरकुटे, रविंद्र वैध, गंगाधर गायकवाड, अक्षय येळवंते, माधव साळवे, महसूल सेवक भगवान इंगळे, राजू खांडेभराड तसेच पोलीस कर्मचारी राजेंद्र डोईफोडे, राम मोरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रशासनाकडून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सातत्याने कठोर कारवाया करण्यात येत असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांकडून महसूल व पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.



