कराटे स्पर्धेत श्रावणी तौरची राज्यस्तरावर निवड!

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाची इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. श्रावणी जानकीराम तौर हिने शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित शालेय कराटे स्पर्धेत श्रावणीने विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. तिने अंडर-19, मायनस 44 किलो वजनी गटात सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विभागीय प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रावणीने मिळविलेल्या या यशामागे तिची जिद्द, चिकाटी, नियमित सराव, मेहनत आणि आत्मविश्वास यांचा मोलाचा वाटा आहे. तिच्या या कामगिरीने विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष अरुण किनगावकर, उपाध्यक्ष रावसाहेब अवघड, सचिव ॲड. संजय देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर वाघमारे, ॲड.संजीव देशपांडे,नितीन कोळेश्वर, जुगलकिशोर भक्कड, संजय राठी, दीपक तांबोळी, जगदीश बडवे, भगवान धोत्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी, मार्गदर्शक क्रीडा शिक्षिका प्रगती भालेकर, तसेच रंजना जानकीराम तौर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्रावणीने आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाचा, संस्थेचा आणि जालना जिल्ह्याचा नावलौकिक उंचवावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




