टेंभुर्णीच्या अहिल्यादेवी नगर मधील रस्त्याची चिखलात रुपांतर, बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत हद्दीतील अहिल्यादेवी नगर भागातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.
पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी या रस्त्याकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. संपूर्ण रस्त्यावर गुडघाभर चिखल, मोठमोठे खड्डे आणि पाणी साचले आहे. या रस्त्यावरून चालणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. सोबतच्या फोटोत दिसत आहे तशीच परिस्थिती प्रत्यक्षात आहे – दुचाकी काय, चारचाकी ट्रक देखील या चिखलात रुतत आहेत.
“हा रस्ता पाहणारा कोणी अधिकारी जिवंत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल
हा मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेक वेळा दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात झाले आहेत. ग्रामपंचायतीने मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करणे अपेक्षित असताना, ग्रामपंचायत प्रशासनाने देखील डोळेझाक केली आहे. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येत असला तरी देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दोन्ही प्रशासनाची आहे.
नागरिकांनी अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधी पाहणी देखील केलेली नाही. करोडो रुपयांचा निधी कागदावर खर्च दाखवला जातो, पण प्रत्यक्षात रस्त्यावर चिखलाशिवाय काहीच नाही, असा आरोप होत आहे.
आक्रमक इशारा
सामाजिक कार्यकर्ते भैय्या देशमुख आणि शुभम मुंघटराव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
“अहिल्यादेवी नगरच्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही. हा केवळ रस्ता नाही तर प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे स्मारक आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास, येत्या सात दिवसात रितसर निवेदन देऊन पंचायत समिती, बांधकाम विभागासमोर रास्ता रोको आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येईल. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा भैय्या देशमुख यांनी दिला आहे.
या आंदोलनात अहिल्यादेवी नगर मधील सर्व तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासन झोपले आहे का?
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे टेंभुर्णी शहराची बदनामी होत असून, संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता आणि ग्रामसेवक यांनी तात्काळ स्थळ पाहणी करून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




