विहिरीजवळ आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह; घातपाताचा संशय
कैलास गिरी तीन दिवसांपासून होता बेपत्ता; दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस, शवविच्छेदनासाठी मृतदेह जालन्याला हलवला
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या गाढेगव्हाण येथे ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. कैलास गुलाब गिरी असे मयताचे नाव असून, तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता. या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना येथे पाठवण्यात आला आहे. शनिवारी (दि. २०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुरे चारणाऱ्या एका गुराख्याला शेताकडे जाताना दुर्गंधी आली. त्याने विहिरीजवळील आडोशाला जाऊन पाहिले असता तरुणाचा कुजलेला मृतदेह पडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली आणि गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, बीट अंमलदार राजू डोईफोडे आणि रमेश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासणी केली, मात्र मृतदेह कुजलेला असल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केल्याने अधिक स्पष्ट अहवालासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जालना येथे पाठवण्यात आला आहे. सध्यातरी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील.
—————————————————————-
नातेवाईकांना घातपाताचा संशय कैलास गुलाब गिरी (वय ३०, रा. गाढेगव्हाण, ता. जाफ्राबाद) याचा मृतदेह २० जून रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून जालना सामान्य रुग्णालयातून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी स्पष्ट केले. कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.



