जाफ्राबाद आगार प्रमुखांची मनमानी; जालना मार्गावर शिवाई बसचा भरणा, सवलतीअभावी हजारो प्रवासी हतबल विद्यार्थी, दिव्यांग, कर्मचारी आणि नियमित प्रवाशांचा संताप; साध्या बसची संख्या वाढविण्याची मागणी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 13
जाफ्राबाद परिवहन आगाराला नुकत्याच प्राप्त झालेल्या शिवाई बसांच्या नियोजनावरून आगार प्रमुख राजपूत यांच्या कारभाराविरोधात प्रवाशांम ध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आगाराला मिळालेल्या ९ शिवाई बसांपैकी बहुतांश बस जाफ्राबाद-जालना मार्गावर सोडण्यात आल्याने या मार्गावरील नियमित प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, शासकीय व खासगी कर्मचारी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक रोज जाफ्राबाद-जालना असा प्रवास करतात. मात्र या मार्गावर शिवाई बसांची संख्या वाढल्याने साध्या बसची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी अनेक प्रवाशांना जादा भाडे देऊन शिवाई बसमधून प्रवास करावा लागत असून, ज्यांना सवलतीचा लाभ मिळत होता अशा प्रवाशांनाही आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार जाफ्राबाद ते जालना शिवाई बसचे भाडे १४६ रुपये असून ज्येष्ठ नागरिक वगळता इतर कोणत्याही प्रवर्गाला सवलत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग, महिला, कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा महिन्याचा खर्च हजारो रुपयांनी वाढल्याची तक्रार केली जात आहे. साध्या बसची प्रतीक्षा; स्थानकात प्रवाशांची गर्दी शिवाई बसांची संख्या वाढविण्यात आली असली तरी जाफ्राबाद बसस्थानकात साध्या बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गर्दी कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रवासी शिवाई बसचे जास्त भाडे परवडत नसल्याने साध्या बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे बसस्थानकात तासन्तास थांबण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. प्रवाशांचा थेट आरोप: आगार प्रमुखांचा एकतर्फी निर्णय प्रवाशांनी आगार प्रमुख राजपूत यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत, प्रवाशांच्या गरजा व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. जाफ्राबाद-जालना मार्गावर शिवाई बसांची संख्या कमी करून साध्या बस वाढविण्याची म ागणी अनेक दिवसांपासून केली जात असतानाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. सवलतींचा प्रश्न ऐरणीवर राज्य परिवहन महामंडळाकडून विविध प्रवर्गांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ साध्या बसमध्ये मिळतो. मात्र शिवाई बसमध्ये हा लाभउपलब्ध नसल्याने विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. सामाजिकदृष्ट्या गरजू घटकांनाच जास्त आर्थिक फटका बसत असल्याने हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तत्काळ निर्णयाची मागणी जाफ्राबाद-जालना मार्गावरील प्रवाशांनी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून शिवाई बसचे नियोजन पुन्हा करावे, साध्या बसची संख्या वाढवावी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही प्रवाशांनी दिला आहे. प्रवाशांच्या सुविधेपेक्षा उत्पन्नाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत असून, जाफ्राबाद आगारातील बस नियोजनाचा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.



