जनगणना प्रशिक्षण वेळेत बदल करा : प्रगणकांना टॅब द्या : जाफराबाद शिक्षक संघर्ष समितीची मागणी

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.27
जाफ्राबाद – उन्हाची वाढती तीव्रता पाहता जनगणना प्रशिक्षण वेळेत बदल करा तथा या कामासाठी नियुक्त सर्व प्रगणकांना टॅब उपलब्ध करून द्या अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व जाफराबाद तालुका शिक्षक हक्क संघर्ष समिती तर्फे करण्यात आली आहे. याबाबत जाफराबाद तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात संघटनेने म्हटले आहे की जाफराबाद तालुक्यात 27 एप्रिल पासून जनगणना प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. सध्या उन्हाची तीव्रता कमालीची वाढल्याने हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात सकाळी 7 ते 12 या वेळात घेण्यात यावे. याशिवाय प्रत्यक्ष जनगणनेचे काम प्रशिक्षणांना मोबाईलवर करायचे सुचित केले आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डोळ्याच्या समस्या भेडसावणार आहे.त्यामुळे जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना टॅब उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षकांना न्याय द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष नसीम शेख यांच्यासह सुधाकर सिंह चिंधोटे, सावता तिडके, धनंजय मुळे, रमेश साळवे, बी. व्ही. मांटे, आर. एस. दंदाले, आर. एच. होळकर, मधुकर गोफणे, गजानन चाटे, एस. एस. काकडे, किरण मंडळकर, प्रमोद डोईफोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


