जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट
दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक
जालना/प्रतिनिधी,दि.26
जनगणना 2027 अंतर्गत दि. 16 मे ते 14 जून, 2026 या कालावधीत महाराष्ट्रात घरसूचीकरण व घरगणना यादी (House Listing Operation) कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या जनगणना कार्यालयाचे अतिरिक्त महानिबंधक संजीव कुमार, आणि उपसंचालक (O.R.G.I) संदिप राय हे (दि. 26 मे) आजरोजी जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी जालना तालुक्यातील मौजे धारकल्याण, बदनापूर नगर पंचायत, बदनापूर तालुक्यातील मौजे शेलगाव, तसेच जालना शहर महानगर पालिकेच्या हद्दीतील जांगडानगर (ढवळेश्वर) येथे प्रत्यक्ष भेटी देऊन सुरु असलेल्या जनगणनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या जनगणना कक्षास भेट देऊन सर्व अधिकारी /कर्मचारी यांची बैठक घेवून जनगणनेच्या कामाबाबत महत्वाच्या सूचना देत मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरु असलेल्या जनगणनेच्या कामकाजाबाबत दिल्ली येथील पथकाने कौतुक करून समाधान व्यक्त.



