तोडोळी-गाडेगव्हाण ग्रामपंचायत ‘वाऱ्यावर’!
महिनाभरापासून ग्रामसेवकच नाही; नवीन अधिकारी पदभार स्वीकारण्यास तयार नाही, बीडिओ साहेबांचे दुर्लक्ष ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे; विकासकामे ठप्प

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19
जाफ्राबाद तालुक्यातील गट ग्रामपंचायत तोडोळी-गाडेगव्हाणचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकच उपलब्ध नसल्याने गावातील सर्व विकासकामे आणि प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, जाफ्राबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (BDO) ज्या नवीन ग्रामसेवकाची येथे नियुक्ती करण्यात आली आहे, तो अधिकारी या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्यास चक्क टाळाटाळ करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नवीन ग्रामसेवक पदभार घेण्यास का घाबरतोय? गेल्या काही दिवसांपूर्वी तोडोळी-गाडेगव्हाण ग्रामपंचायतीमधील पाणी फिल्टरचा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला होता. जुने ग्रामसेवक ‘मेडिकल रजेवर’ असल्याचे सांगून गायब झाले आणि ग्रामपंचायतीचा सर्व कारभार ठप्प झाला. या वादानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती जाफ्राबाद यांच्या स्तरावरून तोडोळी-गाडेगव्हाण ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार दुसऱ्या ग्रामसेवकाकडे सोपवण्यात आला. मात्र, ग्रामपंचायतीमधील अंतर्गत राजकारण आणि आधीच्या गैरव्यवहारांच्या भीतीमुळे नियुक्त करण्यात आलेले नवीन ग्रामसेवक हा पदभार स्वीकारण्यास तयार नाहीत. अधिकाऱ्यांच्या या मनमानीमुळे मात्र सामान्य गावकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ग्रामस्थांची फरफट; दाखले आणि नोंदणीची कामे खोळंबली! सध्या पावसाळ्याचे दिवस आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, गावात महिनाभरापासून ग्रामसेवकच फिरकला नसल्याने ग्रामपंचायतीला जणू कुलूप लागल्याची स्थिती आहे. विद्यार्थ्यांना लागणारे विविध रहिवासी दाखले आणि प्रमाणपत्रे मिळणे बंद झाले आहे. जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी आणि घरकुलासारखी अत्यंत महत्त्वाची कामे रखडली आहेत. पावसाळ्यातील गटारींची साफसफाई आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. एका सहीसाठी गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दररोज जाफ्राबाद पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. “ग्रामसेवक पदभार घेत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, बीडिओ साहेब मूग गिळून गप्प का बसले आहेत?” असा संतप्त सवाल तोडोळी आणि गाडेगव्हाणचे ग्रामस्थ विचारत आहेत.जाफ्राबादच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून तोडोळी-गाडेगव्हाण ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी किंवा अतिरिक्त ग्रामसेवकाची तात्काळ नियुक्ती करावी आणि त्याला पदभार घेण्यास भाग पाडावे. येत्या दोन दिवसांत ग्रामसेवक गावात रुजू न झाल्यास, जाफ्राबाद पंचायत समिती कार्यालयासमोर समस्त गावकऱ्यांच्या वतीने ‘तीव्र ठिय्या आंदोलन’ छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थ ,गजानन पाटील देठे



