वरुड बु. येथील श्री. विश्वासराव वाघ यांना “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार – 2026” जाहीर

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 हा यशवंत सेना, अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 04/09/2026 रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात भोकरदन तालुक्यातील वरुड बु. येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. विश्वासराव संपतराव वाघ यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजसेवेबद्दल “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार – 2026” देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. वाघ हे गेल्या अनेक वर्षांपासून सत्य, समता आणि न्याय या मूल्यांसाठी कार्यरत आहेत. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा प्रसार करून लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा व सामाजिक समतेसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. ग्रामपंचायत पातळीवर पारदर्शकता व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे संपूर्ण भोकरदन तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. गावकरी, सहकारी व सामाजिक संघटनांनी तसेच बोरशे गुरुजी,महजादखान,जनार्दन सोळंके,नारायण सोन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




