जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कृषी वीजपुरवठ्यावर निर्बंध
अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यात 1 डिसेंबरपर्यंत कृषी वीजपुरवठा पूर्ण बंद त्यानंतर आवर्तन संपेपर्यंत दररोज 20 तास भारनियमन
जालना/प्रतिनिधी,दि.25
जायकवाडी धरणातून पहिल्या सिंचन आवर्तनांतर्गत सोडलेले पाणी डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचावे, यासाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्याच्या उद्देशाने कृषी वीजपुरवठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यातील जायकवाडी मुख्य डावा कालवा 30 ते 118 किलोमीटर हद्दीतील लाभक्षेत्रात आजपासून 1 डिसेंबर 2026 या कालावधीत कृषी वीजपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून, त्यानंतर आवर्तन पूर्ण होईपर्यंत दररोज 20 तास वीजबंदी लागू करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी यासंदर्भात निर्देश दिले.
जायकवाडी धरणातून जलसंपदा विभागामार्फत आवर्तनाचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचविणे आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे समन्यायी वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील तरतुदींनुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांनी हे आदेश जारी केले आहेत.
पहिल्या सात दिवसांत पूर्ण वीजबंदी; पुढे चार तास वीजपुरवठा
पाणी आवर्तनासाठी आजपासून लागू केलेले आदेश हे 1 डिसेंबर 2026 म्हणजेच पुढील सात दिवसांसाठी असून, या कालावधीत संबंधित लाभक्षेत्रातील कृषी वीजपुरवठा 100 टक्के खंडित करण्यात येणार आहे. या कालावधीनंतर चालू सिंचन पाणीपाळी पूर्ण होईपर्यंत दररोज 20 तास भारनियमन लागू राहील. दररोज सकाळी 6 ते 10 या चार तासांच्या कालावधीत कृषी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. या निर्बंधांमुळे कालव्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यास मदत होणार असून, पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.
अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यातील जायकवाडी मुख्य डावा कालवा 30 ते 118 किलोमीटर हद्दीतील गावांमध्ये मुख्य कालवा व वितरण व्यवस्थेच्या परिसरातील कृषी विद्युत पंपांच्या वीजपुरवठ्यावर हे निर्बंध लागू असणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अंबड तालुक्यातील भांबरी, दह्याळा, चंदनापुरी खुर्द, चंदनापुरी बुद्रुक, रेणापुरी, चुर्मापुरी, पिं. सिरसगाव, शहापूर, दाढेगाव, धाकलगाव, सौंदलगाव, रामगव्हाण, नालेवाडी, डोणगाव, दोदडगाव, अंतरवाली सराटी, टाका, वडीगोद्री, करंजळा, वडिकाळ्या, घुंगडे हादगाव, भणंग जळगाव, भार्डी, रुई, सुखापुरी, बेलगाव व एकलेहरा या गावांचा समावेश आहे.
घनसावंगी तालुक्यात खा. हिवरा, बाचेगाव, भायगव्हाण, दहिगव्हाण, तीर्थपुरी, खालापुरी, मांदळा, बोडखा, खडका, खडकावाडी, लिंबोनी, सिंदखेड, पिंपरखेड, आरगडे गव्हाण, पाडोळी, कुं, पिंपळगाव, मूर्ती, लिंबी, भेंडाळा, घानेगाव, कोटाळा, विरेगव्हाण व जांबसमर्थ या गावांचा समावेश आहे.
तर परतूर तालुक्यातील वाहेगाव, आंतरवाला, सातारा, आसनगाव, हादगाव, बाणाची वाडी, ढोणवाडी, वडारवाडी, पळशी, धामणगाव, ठोकमाळ, कनकवाडी, लोणी, आष्टी, रायगव्हाण, आनंदगाव, ब्राह्मणवाडी आणि फुलवाडी या गावांमध्ये हे आदेश लागू राहणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले आहे.
आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत निर्धारित वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करावी. आवर्तन काळात मुख्य डावा कालवा परिसरातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
तसेच कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जालना यांनी महावितरण व पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही, यासाठी आवश्यक धडक उपाययोजना व कारवाई करावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 58 अन्वये कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात येणार असून, कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील लाभार्थ्यांपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले आहेत.




