जालना शहरातील भाजप-शिवसेना नगरसेवकांची बैठक महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने संकल्प

जालना/प्रतिनिधी,दि.13
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आ.अर्जुनराव भाऊ खोतकर, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, उमेदवार सुहास सिरसाठ, भास्कर आंबेकर, महापौर वंदना ताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अशोक पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला भाजप व शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी विधानपरिषद निवडणुकीची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, “ही निवडणूक केवळ उमेदवाराची नसून महायुतीच्या विचारांची आणि विकासाच्या राजकारणाची निवडणूक आहे. सर्व नगरसेवकांनी एकजुटीने काम करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुहास सिरसाठ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महायुतीच्या विकासकामांची माहिती द्यावी आणि ही निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकावी. माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात संघटनात्मक बळावर भर देत सांगितले की, “भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ताकद ही तळागाळातील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी आहेत. प्रत्येक नगरसेवकाने ही निवडणूक स्वतःची समजून काम करावे. राज्यातील महायुती सरकारने विकासाला गती दिली असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी आणि विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी सुहास सिरसाठ यांचा विजय महत्त्वाचा आहे. आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, “महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने या निवडणुकीत उतरले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये उत्तम समन्वय असून प्रत्येक मताचे योग्य नियोजन करून विजय निश्चित करायचा आहे. ही निवडणूक संघटनशक्तीची आहे आणि महायुतीची एकजूटच आपल्याला मोठे यश मिळवून देईल. माजी आमदार कैलासजी गोरंटयाल यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, ” सुहास सिरसाठ हे कार्यकर्त्यांशी जोडलेले, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे.” यावेळी भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती



