मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा पुढे येणार? छत्रपती संभाजीनगर-जालना किंवा परभणी-हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी डॉ. संजय लाखे पाटील यांची जोरदार दावेदारी

जालना/प्रतिनिधी,दि.30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेनेचे सचिव तथा सहमुख्य संपर्क प्रमुख (मराठवाडा) डॉ. संजय लाखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना किंवा परभणी-हिंगोली या मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक पातळीवर सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून डॉ. लाखे पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडणे आणि जनसंपर्क वाढविणे या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना तसेच परभणी-हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. या मतदारसंघांत शिवसेनेची मजबूत संघटनात्मक ताकद असून पक्षाशी निष्ठावान असलेला मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील असले तरी डॉ. संजय लाखे पाटील यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षविस्तारासाठी त्यांनी केलेले काम, युवकांमधील लोकप्रियता आणि पक्षश्रेष्ठींशी असलेला समन्वय यामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील पक्ष नेतृत्वाकडे डॉ. लाखे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असल्याची माहिती आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील प्रभावी आणि संघटनक्षम नेतृत्वाला संधी देण्याबाबत पक्ष नेतृत्व सकारात्मक विचार करू शकते, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे. दरम्यान, डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिल्यास ती पूर्ण ताकदीने पार पाडण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना किंवा परभणी-हिंगोली या मतदारसंघांमधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर होते का, याकडे आता संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, डॉ. संजय लाखे पाटील यांच्या दावेदारीमुळे मराठवाड्यातील राजकीय चर्चांना नवे उधाण आले आहे.




