त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मोहपुरीच्या दिंडी सोहळ्याने दुमदुमली बोधलापुरी नगरी आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने भक्तीरस, सामाजिक संदेशाचा अनुपम सोहळा

अनिल भालेकर/अंबड,दि.27
शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली मोहपूरी येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी व गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी ओळखले जाते विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची व भारताची महान संस्कृतीची ओळख होण्यासाठी विविध उपक्रमाचे वेळोवेळी आयोजन केले जाते.महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. वारकरी संप्रदायाची अलौकिक भक्ती परंपरा आषाढी एकादशीच्या रूपाने साऱ्या जगाला अवगत होते. लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात. वारकरी संप्रदायाची शिकवण विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी संस्थापक सचिव ऍड.संजय काळबांडे व प्राचार्य बि.आर डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेची दिंडी आदर्शग्राम बोधलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. पारंपारिक वारकरी वेशभूषेत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी साकार केलेले विठ्ठल रुक्माईचा सजीव देखाव्यासमोर ग्रामस्थ माता-भगिनी नतमस्तक होत होते,संपूर्ण गावातून भगवी पताका हाती घेत, विठ्ठलाच्या नामस्मरणात दिंडी मार्गस्थ होत असताना ग्रामस्थ महिलांच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने स्वागत करण्यात येत होते.जागोजागी रांगोळ्या साकारल्या जात होत्या तर सजवलेल्या पालखीचे व विठ्ठल रुक्माई सजीव देखाव्याचे मनोभावे पूजन केले जात होते. अस्सल मराठमोळ्या वेशभूषेत विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विठ्ठलाच्या भक्ती गीता वर नृत्य कलाविष्कार डोळ्याचे पारणे फेडणारा होता, तर लयबद्ध लेझीम पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. वारकरी संप्रदाय मध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या हरिनाम पावलीचे यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सादरीकरण केले असताना यामध्ये ग्रामस्थ महिला उस्फूर्तपणे सहभागी होत पावली खेळण्याचा दंग झाले. ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकवृंद साठी विशेष फळ वाटप व पाणी व्यवस्था याप्रसंगी केली. गावातील आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई मंदिरा समोरील प्रांगणात भक्ती रसाचा अनुपम सोहळ्याप्रसंगी ग्रामस्थ तल्लीन झाल्याचे दिसून आले. मनोगतात ग्रामस्थांनी शाळेचे व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे विशेष कौतुक केले.




