सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व विद्यार्थी जीवनातच घडते- प्राचार्य डॉ ठक्कर.
रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा व व्यक्तिमत्व विकास शॉर्ट टर्म कोर्स चे उद्घाटन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
महाविद्यालयात विद्यार्थी विकासाच्या दृष्टिकोनातून विविध अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.महाविद्यालयीन शिक्षण घेताना अभ्यासासोबतच सर्वांगीण विकास व कौशल्य आत्मसात करण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, त्यासाठी विविध लघु अभ्यासक्रम सहाय्यभूत ठरतील, सर्वस्पर्शी विकासा साठी विद्यार्थी जीवनात सदर अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन येथील प्राचार्य डॉ आमोद ठक्कर यांनी मानसशास्त्र विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्व विकास लघु अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात केले. या वेळी व्यासपीठावर रेखा देशपांडे, कुसुम ठाकूर, कुंदा पाटील, ललिता पाटील, रजनी पाटील आदी उपस्थित होते. कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व मागील वर्षीच्या लघु अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून कार्यशाळेची सुरुवात झाली. प्रथम सत्रात उरण मधील प्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे महत्व प्रतिपादित केले तसेच त्यांनी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या व्यक्तिमत्वातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले. दुसऱ्या सत्रात रेखा देशपांडे यांनी संविधानातील तत्वे, अधिकार,कर्तव्ये यांची सांगड व्यक्तिमत्व विकासाशी घालून उत्तम नागरिकाचे महत्व विशद केले. कार्यशाळेच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ संदीप घोडके यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभाग प्रमुख योगेश कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रांजल भोईर, प्रा. तन्वी कोळी, प्रा. धर्मराज ढवळे यांनी परिश्रम घेतले, कार्यशाळेसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




