कुंभारझरी येथिल शेतकऱ्याचा शॉटसर्किटमुळे एक एकर ऊस जळून खाक!
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो एकरांवरील ऊस पिकाचे नुकसान टळले;

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1
जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील शेतकरी विनायक लक्ष्मण चव्हाण यांच्या शेतातील एक एकर ऊसला शॉटसर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महावितरणच्या गलथान कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सतर्कता दाखविल्याने परिसरातील शेकडो एकरांवरील ऊस पिकाला आगीच्या विळख्यातून वाचविण्यात यश आले. तर गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.
*एका एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी*
कुंभारझरी येथील शेतकरी विनायक लक्ष्मण चव्हाण यांनी आपल्या शेतात ऊस पिकाची लागवड केली होती. ऊस पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने त्यांनी मेहनत घेतली होती. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या शेतातील एक एकर ऊस जळून खाक झाला. पिकाचे नुकसान झाल्याने चव्हाण यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतात उभे असलेले पीक डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.
*गावकऱ्यांची सतर्कता; शेकडो एकर ऊस वाचला..*
ऊसाला आग लागल्यानंतर ती वेगाने पसरून शेजारील शेतांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड असल्याने आग नियंत्रणात आली नसती, तर शेकडो एकरांवरील ऊस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, गावकऱ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि सतर्कतेमुळे आगीचा संभाव्य विस्तार रोखण्यात मदत झाली. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले.
या घटनेत एका शेतकऱ्याचे एक एकर ऊस पीक जळून खाक झाले असले, तरी गावकऱ्यांनी वेळीच दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. संकटाच्या वेळी गावकऱ्यांनी दाखविलेली एकजूट आणि सहकार्य कौतुकास्पद ठरत आहे.
महावितरण सह संबंधित यंत्रणेने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा..
आगीत एक एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकरी विनायक लक्ष्मण चव्हाण यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसाठी केलेला खर्च, मेहनत आणि अपेक्षित उत्पन्न यांचा विचार करता या नुकसानीचा शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित महावितरण, महसूल व कृषी विभागाने या घटनेची दखल घेऊन शेतातील नुकसानीची पाहणी करावी आणि शासनाच्या नियमानुसार मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे….



