आषाढी एकादशी निमित्त केशव शिवणी येथे श्री केशवराजांची भक्तिमय महापूजा; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

जालना/प्रतिनिधी, दि.26
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील श्री केशवराज संस्थानात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री केशवराजांची विधिवत महापूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. संस्थानचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उदावंत यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या गजरात महापूजा पार पडली. या सोहळ्यास परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री केशवराजांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला.
आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वेदमंत्र, हरिनामाचा गजर आणि धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. महापूजेनंतर श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्री केशवराजांचे दर्शन घेत सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता.
विशेष म्हणजे, श्री केशवराज मंदिराचा नुकताच भव्य जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिराची उभारणी पारंपरिक हेमाडपंथी स्थापत्यशैलीत करण्यात आली आहे. मंदिरातील श्री केशवराजांची आकर्षक मूर्ती नेपाळमधील पवित्र गंडकी पाषाणापासून साकारण्यात आली आहे. या मूर्तीचे सौंदर्य, शिल्पकला आणि दिव्यता भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
श्री केशवराज महाराजांविषयी एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, भगवान श्रीराम प्रभू वनगमनाच्या प्रवासात असताना मार्गात भगवान शंकरांचे दर्शन घेतले. त्यावेळी जवळच भगवान विष्णूंचे अर्थात श्री केशवराजांचे मंदिर असल्याचे समजताच त्यांनी मार्ग बदलून श्री केशवराजांचे दर्शन घेतले. त्यामुळे त्या परिसराला ‘मुरुडेश्वर’ हे नाव प्रचलित झाले. तसेच श्री केशवराजांच्या नावावरून पुढे गावाचे नाव ‘केशव शिवणी’ पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पुराणांमध्ये श्री केशवराज हे भगवान श्रीविठ्ठलाचेच दुसरे स्वरूप असल्याचा उल्लेख आढळतो. तसेच मंदिरातील श्री केशवराजांची मूर्ती अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या मूर्तीशी साम्य दर्शवित असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते.
या मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या पाच भव्य हेमाडपंथी मंदिरांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, भगवान श्रीराम, संत शिरोमणी नरहरी महाराज, मुक्ताबाई आईसाहेब, माता पार्वती, श्री गणेश, भगवान शंकर तसेच संत भगवान बाबा यांच्या मनमोहक मूर्ती भाविकांना पाहावयास मिळतात. या सर्व मूर्ती नेपाळमधील गंडकी पाषाणापासून साकारण्यात आल्या असून त्यांचे कलात्मक सौंदर्य भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देणारे ठरत आहे.
श्री केशवराज संस्थानात दरवर्षी श्रीराम नवमी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी आदी धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विशेष म्हणजे, सर्व धर्मीय नागरिकांच्या सहकार्याने येथे सर्वधर्म समभावाची परंपरा जपली जाते. अन्नदान, नामस्मरण आणि समाजात भक्तीभाव रुजविणे हा संस्थानचा मुख्य उद्देश असून ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.
या महापूजेला संस्थानचे सर्व विश्वस्त, गावाचे सरपंच विकास आंधळे, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच गावातील बहुसंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष वसंतराव उदावंत यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करत समाजात भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची परंपरा जपण्याचे आवाहन केले. तसेच सरपंच विकास आंधळे यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, भाविक आणि संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
श्रद्धा, भक्ती, सेवा, अन्नदान आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा आषाढी एकादशी उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला असून संपूर्ण केशव शिवणी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.



