ग्रामीण संस्कृतीची ओळख असलेली ‘बाहुल्या’ परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर.—-ह. भ. प.विठ्ठल महाराज शेंबेकर

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.25
गावागावात लग्नसमारंभ म्हटला की ढोल-ताशांचा गजर, नातेवाईकांची लगबग आणि पारंपरिक विधींनी सजलेले वातावरण असे चित्र पाहायला मिळायचे. या सर्वांमध्ये एक खास आकर्षण असायचे ते म्हणजे ‘बाहुल्या’ काढण्याची जुनी प्रथा. मात्र बदलत्या काळानुसार आणि आधुनिकतेच्या प्रभावामुळे ही परंपरा आता हळूहळू नामशेष होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी लग्नसोहळ्याची सुरुवातच बाहुल्या काढल्याशिवाय होत नसे. या विधीतून कुटुंबातील आनंद, ऐक्य आणि संस्कृतीचे दर्शन घडत असे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या परंपरेत उत्साहाने सहभागी होत असत. त्यामुळे लग्नाला एक वेगळीच रंगत आणि पारंपरिक छटा लाभत असे. आज मात्र डीजे, आधुनिक सजावट, वेगवान जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे या लोकपरंपरांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरांसोबतच ग्रामीण भागातही या प्रथा कमी होत चालल्या आहेत. काही ठिकाणी अजूनही ज्येष्ठ मंडळी जुन्या रूढी-परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असली तरी नवीन पिढीमध्ये त्याबाबतची जाणीव कमी होताना दिसते. संस्कृती आणि परंपरा या समाजाच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे ‘बाहुल्या’ सारख्या लोककलेच्या आणि परंपरेच्या जतनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात या केवळ आठवणींतच उरतील, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे कारभारी पांचे विवाह सोहळ्यामध्ये रामु गांवडे बाहुल्या बनवताना. चौकट “बाहुल्या’ ही केवळ एक प्रथा नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओळख आहे. पूर्वी प्रत्येक लग्नसमारंभात ही परंपरा आवर्जून पाळली जायची. त्यामुळे नातेवाईकांमध्ये आपुलकी वाढायची आणि मुलांनाही आपल्या संस्कृतीची ओळख होत असे. पण आजच्या आधुनिकतेच्या लाटेत या गोष्टी मागे पडत आहेत, ही खंत वाटते. नवीन पिढीने आपल्या परंपरा जपल्या तरच आपली संस्कृती टिकून राहील. गावपातळीवर पुन्हा ‘बाहुल्या’ सारख्या लोकपरंपरा सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.




