जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी,दि.28
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित ‘सेवा हक्क दिन’ कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार श्रीमती तायडे, तहसिदार श्री. अनिल नव्हाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, “सेवा हक्क कायद्याचा मुख्य उद्देश प्रशासनाला लोकाभिमुख करणे आहे. नागरिकांनी जागरूक होऊन आपला हक्क मागावा. सेवा मिळण्यास विलंब झाल्यास अपील करण्याची तरतूद देखील कायद्यात आहे.” प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे म्हणाल्या की, सेवा हक्क दिनानिमित्त, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यासाठी आणि सेवा ट्रॅक करण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल व मोबाईल ॲप वापरण्याचे आवाहन केले. या डिजिटल माध्यमामुळे पारदर्शकता वाढली असून, प्रशासकीय कामे अधिक गतिमान झाली आहेत. ‘आपले सरकार पोर्टल’ वर 500 हून अधिक सेवाद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून शासकीय कामकाजातील कार्यक्षमता वाढली आहे. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिनियमाचे उद्दिष्ट्ये, डिजिटल सेवा आणि ऑनलाइन प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना सुलभ सेवा कशा मिळू शकतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपस्थित विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘सेवा हक्क दिना’निमित्त शपथ घेतली. यावेळी वेळेत सेवा देणाबाबत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱी आणि निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कारही करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात आला आहे. जालना जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी ‘घरपोच शासकीय सेवा’ हा उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी झाली असून, सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे. राज्यभरातील इतर जिल्ह्यांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.




