विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव; सुयश कॉलेज ऑफ फार्मसीत दीक्षांत समारंभ उत्साहात
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11
जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था संचलित सुयश कॉलेज ऑफ फार्मसी, वारुड बु. येथे डिप्लोमा इन फार्मसी व पीजीडीएमएलटी (LX) अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, दीक्षांत शाल व टोपी प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी लहाने, व्यंकटेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय वायाळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय वायाळ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, पालक, माजी विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रामाणिकपणा, व्यावसायिक नैतिकता, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन केले. औषधनिर्माण व आरोग्य सेवेमध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील शिक्षण, शिस्त आणि संस्कार यांच्या बळावर विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी लहाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, संशोधन व समाजसेवा या क्षेत्रात प्रगती करत संस्थेचे नाव देशभरात उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समारंभाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. समारंभानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक, पालक व सहाध्यायांसमवेत छायाचित्रे काढत आपल्या अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला.




