डी आर टी ए सी एफ एस कॉनकोर कंपनीच्या गेट समोर १११ कामगारांचे काम बंद आंदोलन.
४ महिन्यापासून वेतन न दिल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ. कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने कामगारांवर आंदोलनाची वेळ. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा रायगड श्रमिक संघटनेचा प्रशासनाला इशारा. दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आंदोलनाचा पहिला दिवस.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
मे. सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स या कंत्राटदारामार्फत डी.आर.टी.ए सी.एफ. एस, कॉनकोर, द्रोणागिरी,पागोटे उरण येथे कार्यरत असलेल्या १११ कामगारांचे मागील चार महिन्यांचे बेकायदेशीर वेतन कपात केल्याबद्दल पूर्ण सी.एफ.एस चे काम सदर १११ कर्मचाऱ्यांनी बंद केले आहे.सतत होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड श्रमिक संघटनेच्या माध्यमातून व कॉम्रेड तथा कामगार नेते भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी कंपनीच्या गेट समोरच आंदोलन सुरु केले आहे. रायगड श्रमिक संघटना अंतर्गत डी. आर.टी.ए. सी.एफ.एस, कॉनकोर, द्रोणागिरी, पागोटे येथील कामकाजामध्ये मे. सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स या कंपनीच्या कंत्राटाअंतर्गत लेबर, सुपरवायजर व सर्वेअर्स अशा पदांवार कार्यरत असलेले एकून १११ कामगार कार्यरत आहेत.सदर ठिकाणी कामगारांचे दैनंदीन कामकाज व देखरेख सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स या कंपनीचे व्यवस्थापक विजय शास्त्री हे पाहतात.मे. सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स यांनी गेली ४ महिने (जुन २०२६ ते सप्टेंबर २०२६) चे बेकायदेशीर पध्दतीने कामगारांचे वेतन कपात केले आहे त्याबद्दल त्यांच्या सोबत कामगारांनी वारंवार चर्चा करून सुध्दा कामगारांचे बेकायदेशीर रित्या वेतन कपात करण्यात आले आहे.त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरले आहे. सर्व कामगारांवर आजपर्यंत सोपविण्यात आलेली कामे कामगार वर्ग प्रामाणिकपणे, जबाबदारीने व नियमीतपणे पार पाडत आले आहेत . तथापि, गेल्या काही महिन्यांपासून कामगारांच्या बाबतीत अत्यंत अन्यायकारक व गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली असून कामगारांच्या आर्थिक, व्यावसायीक व कायदेशीर हक्कांवर गदा येत आहे. त्याबाबत सर्व कामगारांनी सामूहिक तक्रार नोंदवून तातडीने न्याय मिळण्यासाठी कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे.गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आंदोलनाचा पहिला दिवस होता.या पहिल्या दिवशी आंदोलन स्थळी कॉम्रेड तथा कामगार नेते भूषण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड. भार्गव पाटील, भाजपचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील, उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष विजय पाटील, सरपंच कुणाल पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष आशिष तांडेल,माजी अध्यक्ष प्रकाश भोईर, सेक्रेटरी रमेश पाटील,कामगार नेते अरुण पाटील,कामगार नेते विनोद पाटील, रायगड श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्राणनाथ पाटील, उपाध्यक्ष भूमीत भगत, सेक्रेटरी मितेश पाटील, खजिनदार जगदीश तांडेल,सदस्य भरत पाटील, विद्याधर ठाकूर,कलमार ऑपरेटर अजय कदम,पागोटे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पागोटे ग्रामस्थ, कामगार वर्ग, महिला सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या मागण्या खालीलप्रमाणे :- १) मागील ४ महिन्यांतील प्रत्येक कामगारांची संपूर्ण वेतन थकबाकी निश्चित करून ती कायद्यानुसार तातडीने अदा करण्यात यावी. २) प्रत्येक कामगाराला वेतनाची गणना दर्शविणारे वेतनपत्रक, उपस्थितीचा तपशील व अदा केलेल्या रक्कमांचे अधिकृत विवरण देण्यात यावे. (पेमेंट स्लीप देण्यात यावे). ३) श्री. विजय शास्त्री यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळ, धमक्या, कामगारांना लक्ष्य करणे व प्रतिशोधात्मक वागणुकीच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यात्री. ४) श्रीमती. सोनाली पाटील व श्रीमती स्नेहा पाटील यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कामगाराला धमकविणे, दबाव आणणे किंवा तक्रारीशी संबंधित असल्यामुळे त्रास देणे तातडीने थांबविण्यात यावे. ५) कोणत्याही कामगाराला बेकायदेशीररीत्या कामावरून कमी करणे, कामावर येण्यास अडथळा आणणे वेतन रोखणे किंवा खोट्या तक्रारींच्या आधारे त्रास देणे टाळण्यात यावे. ६) सर्व कामगारांचे वेतन नियमीतपणे व निर्धारित मुदतीत (महिण्याच्या ७ तारखेला) अदा करण्याची लेखी हमी देण्यात यावी. ७) पी.एफ., इ.एस.आय.सी., बोनस, ओव्हरटाईम किंवा इतर लागू कायदेशीर लाभांची पात्रतेनुसार तपासणी करून कोणतीही थकबाकी असल्यास ती अदा करण्यात यावी. ८) सर्व कामगारांचे फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२६ पर्यंत रजेचे कार्ड भरणे व बाकी रजेचे इनकॅशमेंट देणे. ९) झालेला कायदेशीर करार (अग्रीमेंट ) नुसार २०२६ चा बोनस ग्रॉस पेमेंट व १००० दिवाळी च्या ७ दिवस अगोदर जमा करणे. १०) बेकायदेशीर ५ कामगार कमी केले आहेत त्यांच्या जागी त्यांचे नातेवाइक घेण्याचे मान्य करून सुध्दा आज पर्यंत घेतले नाहीत, त्यांना कामावर घेणे. ११) कामगारांना पूर्वी सकाळ व दुपार अशा २ शीप मध्ये काम चालू असताना सध्दस्थितीत सर्वांना १ जनरल शीप केली आहे ती पूर्वी प्रमाणे २ शीप मध्ये करणे. १२) सर्व कामगारांचे ४ दिवसांचे वेतन थकबाकी आहेत ते तातडीने अदा करण्यात यावे. १३) ७ ते ८ कामगारांचे मेडीकल बील अंदाजे रक्कम रू ३ ते ४ लाख बाकी ते अदा करणे. १४) सदर प्रकरणात वरिष्ठ व्यवस्थापनाची बैठक बोलावून कामगारांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे व प्रत्येक मागणीवर लेखी निर्णय देण्यात यावा.




