उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे शेतकऱ्यांकडून रात्रीची शेती मशागत

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.9
जाफ्राबाद तालुका हा मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिरची लागवडीचे नियोजन सुरू केले असून शेतीच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रखर उन्हामुळे दिवसा शेतात काम करणे कठीण बनले असून अनेक शेतकरी आता रात्रीच्या वेळी शेती मशागत करताना दिसत आहेत.
मिरची लागवडीपूर्वी शेतात बेड तयार करणे, ठिबक सिंचन यंत्रणा बसविणे, मल्चिंग पेपर अंथरणे, खत व्यवस्थापन करणे अशी अनेक कामे काळजीपूर्वक करावी लागतात. विशेषतः मल्चिंग पसरविताना योग्य तापमान आवश्यक असते. सध्या उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की दिवसा मल्चिंग पेपर तापून सैल पडतो किंवा व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या थंड वातावरणात ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड तयार करून मल्चिंग अंथरण्याचे काम करत आहेत. रात्री काम केल्याने मल्चिंग व्यवस्थित बसते तसेच शेतकऱ्यांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. काही ठिकाणी शेतकरी मध्यरात्रीपर्यंत शेतात राबताना दिसून येत आहेत.
दरम्यान, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, वाढलेले खत व औषधांचे दर आणि मजुरी खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत केवळ पिक वाचवण्यासाठी रात्री शेती मशागत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



