जाफ्राबाद तालुक्याच्या प्रमुख रस्त्यासाठी २४० कोटींचा निधी मंजूर आ. संतोष दानवे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि 2
भोकरदनजाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत रामा २२४ ते बरंजळा लोखंडे बरंजळा साबळे जवखेडा ठेंग जानेफळ पं बोरगाव (बु.) बोरी (खु.) बोरगाव (मठ) भारज (बु.) भारज (खु.) वरुड (बु.) कोनड (बु.) ते जिल्हा सरहद्द या प्रमुख मार्गाच्या सुधारणा व मजबुतीकरणासाठी २४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीसाठी आमदार संतोष पाटील दानवे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. या रस्त्यामुळे बरंजळा (साबळे), जवखेडा (ठेंग), माहोरा, बोरगाव (बु.), वरुड (बु.), भारज (बु.), चापनेर, धोंडखेडा, बेलोरा आदी गावांचा संपर्क अधिक सक्षम होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत जलद पोहोचविणे, विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयांचा प्रवास सुलभ करणे, रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे तसेच व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे दळणवळण अधिक सुरक्षित व गतिमान होण्यास या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. मतदारसंघातील ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते उभारणे आणि विकासाला गती देणे हेच आपले प्राधान्य असल्याचे आमदार दानवे यांनी सांगितले. या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आमदार दानवे यांनी आभार मानले. या प्रकल्पामुळे भोकरदनजाफ्राबाद मतदारसंघातील ग्रामीण विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


