जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन; मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

जालना/प्रतिनिधी,दि.26
जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात 25 मे 2026 रोजी पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे यशस्वी आगमन झाले. या पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जालना ड्रॉयपोर्टचे व्यवस्थापक विकास मलिक यांच्यासह अधिकारी आणि उद्योजकांची उपस्थिती होती. यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाडा विभागात रेल्वे-संलग्न मालवाहतूक सेवांची औपचारिक सुरुवात झाली आहे.पहिली इनबाउंड कंटेनर रेक ‘पोलाद स्टील’ कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन एमएमएलपी जालना येथील रेल्वे सायडिंगवर दाखल झाली. या यशस्वी ट्रायलमुळे उद्योगांसाठी रेल्वे, रस्ता आणि बंदर यांचा समन्वय साधणाऱ्या एकात्मिक मल्टी मॉडेल मालवाहतुकीची नवी दारे खुली झाली आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन लिमिटेड (NHLML) या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला हा देशातील पहिलाच ड्राय पोर्ट/मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्प आहे. “महाराष्ट्र एमएमएलपी प्रायव्हेट लिमिटेड” (MMPL) या विशेष उद्देश वाहन (SPV) अंतर्गत हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम गतिशक्ती’ आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होणे, मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणे, कार्बन उत्सर्जनात घट आणि इंधन बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत मालवाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, आयात-निर्यात (EXIM) व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची वैधानिक मान्यता देखील या प्रकल्पाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता जालन्यासह मराठवाड्यातील उद्योगांना थेट आयात-निर्यात माल हाताळणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. एमएमएलपी जालना प्रकल्पामुळे मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून, अंतर्गत महाराष्ट्रातील निर्यात-आयात व्यापाराला नवी गती मिळेल. जालना ते जेएनपीए बंदर तसेच राष्ट्रीय लॉजिस्टिक्स कॉरिडॉरशी थेट जोडणी झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी भारतीय रेल्वे, सीमाशुल्क विभाग, महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणा तसेच संबंधित सर्व भागधारकांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांचे जालना जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. पहिल्या ट्रायल कंटेनर रेकच्या यशस्वी आगमनामुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा विभागात लॉजिस्टिक-आधारित औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.



