मार्च 2026 मधील गारपीट-अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 2 कोटी 52 लाखांची मदत मंजूर
जालना/प्रतिनिधी,दि.19
जिल्ह्यात मार्च 2026 दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने जालना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल रु. 2 कोटी 52 लाख 89 हजार 290 इतक्या निधीस मंजुरी दिली असून, हा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील एकूण 2,857 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत. सुमारे 1498.30 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी शासनाकडे प्रपत्र अ, ब, क आणि ड अहवाल सादर करण्यात आले होते. शासन निर्णय क्रमांक सीएलएस 2026 / प्र.क्र. 76 (भाग-8) / मदत-1 (म-3), दिनांक 18 मे 2026 अन्वये संबंधित निधीस मंजुरी देण्यात आली आहे. तालुकानिहाय नुकसान व मंजूर निधीचा तपशिल खालील प्रमाणे आहे. • जालना तालुका :273 शेतकरी बाधित, 148 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त, अपेक्षित निधी रु. 25.16 लाख • बदनापूर तालुका :1259 शेतकरी बाधित, 617.10 हेक्टर क्षेत्र बाधित, अपेक्षित निधी रु. 1 कोटी 5 लाख 52 हजार 300 • भोकरदन तालुका :198 शेतकरी बाधित, 65.80 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त, अपेक्षित निधी रु. 9 लाख 6 हजार 100 • जाफ्राबाद तालुका :2 शेतकरी बाधित, 1 हेक्टर क्षेत्र बाधित, अपेक्षित निधी रु. 20 हजार 190 • मंठा तालुका :153 शेतकरी बाधित, 65.90 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त, अपेक्षित निधी रु. 10 लाख 40 हजार 400 • घनसावंगी तालुका :972 शेतकरी बाधित, 600.50 हेक्टर क्षेत्र बाधित, अपेक्षित निधी रु. 1 कोटी 2 लाख 54 हजार 300 प्रशासनाने संबंधित महसूल व कृषी विभागाला शासन निर्णयातील तरतुदींनुसार पात्र शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निधी वितरणाचा अहवाल त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेशही निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले आहेत.



