pub-7425537887339079
ब्रेकिंग

महेंद्र दळवींच्या वक्तव्यावर उरण राष्ट्रवादीचा संताप; परीक्षित ठाकूर यांचा जोरदार पलटवार!

"मरण प्रत्येकालाच आहे, दुसऱ्याच्या मृत्यूची भाषा करण्यापेक्षा स्वतःच्या शब्दांचे भान ठेवा"; दळवींना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

0 5 4 0 1 0
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
राजकारणात विरोधकांशी संघर्ष करावा, विचारांची लढाई लढावी; मात्र मित्रपक्षातील ज्येष्ठ नेत्यांविषयी बोलताना किमान सभ्यतेचे भान तरी ठेवावे, अशी अपेक्षा असते. परंतु शिवसेना (शिंदे गट) चे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याचा उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी जाहीर निषेध केला आहे. ठाकूर यांनी दळवींना थेट प्रत्युत्तर देत त्यांच्या वक्तव्यावरून लोकप्रतिनिधींच्या भाषेच्या मर्यादेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
माणगाव येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली होती. तटकरे कुटुंबाला कधीही जवळ करणार नसल्याचे सांगतानाच सुनील तटकरे यांना त्यांच्या पक्षात कोणीही विचारत नसल्याचा दावा केला. आगामी काळात त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल, असेही त्यांनी म्हटले. त्यातच ‘मरतानाही कफन घेऊन जाणार’ अशा आशयाच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या वक्तव्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्याशी शिवसेना पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दळवींना समज दिल्याची माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी “पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी,” असे म्हणत संयमी प्रतिक्रिया दिली.
उरण राष्ट्रवादीचा जाहीर निषेध; ठाकूर यांचा दळवींना थेट सवाल!
आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्याचा निषेध करताना परीक्षित ठाकूर यांनी स्पष्ट केले की, सुनील तटकरे साहेब हे आमच्यासाठी गुरुस्थानी आहेत. त्यांच्याबद्दल केलेला अपमानास्पद उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत.
विशेष म्हणजे, परीक्षित ठाकूर यांनी शिवसेना पक्षाला या वादात ओढलेले नसून आपला आक्षेप केवळ आमदार महेंद्र दळवी यांच्या वैयक्तिक वक्तव्यावर असल्याचे स्पष्ट केले. आमदारपद हे जनतेने दिलेली जबाबदारी आहे, वैयक्तिक टीका करण्याचा परवाना नाही. सार्वजनिक व्यासपीठावरून बोलताना पदाची प्रतिष्ठा आणि भाषेची मर्यादा राखणे गरजेचे आहे. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन अशा प्रकारची भाषा वापरणे सुसंस्कृत राजकारणाला शोभणारे नाही, असे ठाकूर यांनी सुनावले.
“दळवीसाहेब, मरण प्रत्येकालाच आहे; दुसऱ्याकडे उगाचच बोट दाखवू नका!”
सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना परीक्षित ठाकूर यांनी अत्यंत परखड भूमिका मांडली. “आमदार महेंद्र दळवी हेसुद्धा मरताना कफन घेऊन जाणार आहेत. मरण प्रत्येकालाच अटळ आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याकडे उगाचच बोट दाखवू नये. दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल आणि मृत्यूबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या वक्तव्याचे आत्मपरीक्षण करावे,” असे ठणकावून सांगत ठाकूर यांनी दळवींना प्रत्युत्तर दिले.
ते पुढे म्हणाले की, सुनील तटकरे साहेबांचा अपमान हा आमचा अपमान आहे. त्यांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठामपणे उभे राहतील. भविष्यात आमदार महेंद्र दळवी यांनी अशाच प्रकारची वैयक्तिक आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केली, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मित्रपक्षाचा सन्मान राखता येत नसेल तर महायुतीच्या एकजुटीची भाषा कशासाठी?
महायुतीमध्ये एकत्र सत्तेत सहभागी असताना मित्रपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर सार्वजनिक व्यासपीठावरून वैयक्तिक टीका होणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. युती केवळ सत्तेसाठी नसते, तर परस्पर सन्मान, विश्वास आणि समन्वयावर टिकून असते. त्यामुळे मित्रपक्षाच्या नेत्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येक घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, अशी भूमिका परीक्षित ठाकूर यांनी मांडली.
अंतर्गत मतभेदांचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये, यासाठी महायुतीतील सर्व नेत्यांनी संयम राखून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एकीकडे महायुतीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र असलेले पक्ष आणि दुसरीकडे सार्वजनिक व्यासपीठावरून सुरू असलेली परस्परांवरील टीका, यामुळे रायगडमधील राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्याला उरण राष्ट्रवादीने जाहीर निषेध आणि आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने हा वाद आता अधिक चर्चेत आला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना आणि महायुतीतील अन्य पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे