एसआयआर मोहिमेला वेग; जाफ्राबाद नगर पंचायतेत बीएलओंची आढावा बैठक

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
राज्यभर सुरू असलेल्या विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जाफ्राबाद नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत क्षेत्रातील बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत एसआयआर मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या घरभेटी, मतदारांची माहिती संकलन, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तसेच प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे नोंदविण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांनी प्रत्येक बीएलओने आपल्या प्रभागातील काम निर्धारित वेळेत, पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. कोणताही पात्र मतदार प्रक्रियेपासून वंचित राहू नये तसेच सर्व नोंदी शासनाच्या नियमांनुसार अचूक ठेवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एसआयआर मोहिमेतील अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी बीएलओंना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले. जाफ्राबाद नगर पंचायत क्षेत्रात एसआयआर प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारीला अधिक वेग दिला असून, बैठकीला सर्व संबंधित बीएलओ उपस्थित होते.




