“नळविहिरा येथे भीषण आग; मक्का पिकासह लाखोंचे नुकसान”

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि 27
जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा येथे शेतात अचानक लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भागवत पांडुरंग मोरे आणि एकनाथ विश्वनाथ मोरे यांच्या शेतात ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत सुमारे तीन ते चार एकर क्षेत्रावरील मक्का पीक पूर्णपणे जळून खाक झाले. यासोबतच शेतातील सीड्स प्लॉटवर लावलेले संरक्षणात्मक नेट देखील आगीत भस्मसात झाले आहे. काही क्षणांतच पसरलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट, वाऱ्यामुळे लागलेली ठिणगी किंवा इतर कारणांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या मदतीने काही वेळाने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान, या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शासनाने वेळेत मदत केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


