तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बालकांना सुट्टी देण्याची आयोगाची शिफारस पोषण आहाराची पर्यायी व्यवस्था करा; बालहक्क संरक्षण आयोगाचे महिला व बालकल्याण विभागाला निर्देश
बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती

जालना/प्रतिनिधी,दि.14
राज्यभरात एप्रिल आणि मे महिन्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. अंगणवाडीतील बालकांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी किमान एक महिन्याची सुट्टी जाहीर करण्यात यावी, तसेच पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे वैधानिक निर्देश आयोगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना दिले आहेत. अशी माहिती बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनी दिली. या संदर्भात माहिती देताना डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून, प्रशासनाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडीतील लहान बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने २७ एप्रिल २०२६ रोजी पत्राद्वारे महिला व बालविकास विभागाकडे अहवाल मागविला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोषण आहार प्रीमिक्स स्वरूपात देण्याबाबतही विचारणा करण्यात आली होती. मात्र आयोगाच्या वारंवार पत्रव्यवहार आणि स्मरणपत्रांनंतरही संबंधित विभागाकडून अहवाल सादर करण्यात आलेला नाही. ३० एप्रिल २०२६ रोजी आयोगाच्या बैठकीत आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपस्थित उपायुक्त श्री. क्षिरसागर यांना बालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयोगाने पत्रव्यवहारात तातडीने असा स्पष्ट उल्लेख करूनही प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याने आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर होतात. मात्र याला अपवाद ठरतात ते अंगणवाडीतील बालक. वास्तवात शाळांना सुट्टी लागल्यानंतर अनेक कुटुंबे नातेवाईकांकडे स्थलांतर करतात आणि मोठ्या भावंडांसोबत अंगणवाडीतील मुलेही गावाबाहेर जातात. त्यामुळे अंगणवाडीतील पोषण आहाराचे उद्दिष्ट देखील प्रभावीपणे पूर्ण होत नसल्याचे आयोगाने निदर्शनास आणले आहे. १२ मे २०२६ रोजी आयोगाचे अध्यक्ष श्री. संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सदस्य डॉ. संजय लाखेपाटील, श्रीमती गीतांजली बुटी, श्रीमती तांबट, श्रीमती मिलन जंगम, श्री. प्रवीण बुजाडे, सचिव श्री. पंकज देवरे (IAS) आणि प्रशासकीय अधिकारी श्रीमती वंदना जैन उपस्थित होते. या बैठकीत आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर करत पुढील वैधानिक निर्देश जारी केले.
—————————————————————
आयोगाचे महत्त्वाचे निर्देश…! राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीतील बालकांना किमान एक महिन्याची सुट्टी देण्यात यावी. सुट्टीच्या कालावधीत बालकांच्या पोषण आहारासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. टेक होम रेशन स्वरूपातील प्रीमिक्स पॅकेटद्वारे पोषण आहार उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. आयोगाच्या शिफारशींवर विभागाने घेतलेल्या निर्णयाचा सविस्तर लेखी अहवाल आठ दिवसांत सादर करावा. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनी दिली.



