शिक्षक साजिद खान यांना ‘स्टेट बेस्ट टीचर अवॉर्ड २०२६’ प्रदान
मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला सन्मान; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे जालना जिल्ह्यातील शिक्षक पठाण साजिदखान नजबखान यांना मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘स्टेट बेस्ट टीचर अवॉर्ड २०२६’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
पठाण साजिदखान नजबखान हे सेवली, ता. जि. जालना येथील मो. अली जोहर उर्दू हायस्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार आला आहे.
भारतातील पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री व स्वातंत्र्यसैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर, टी. व्ही. सेंटर रोड, येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास मा. आमदार विक्रम काळे, सिनेअभिनेते तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाचे सहसचिव अनिल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे संचालक तथा मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग होते, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मोहम्मद युनूस अन्सारी आणि कार्यक्रमाचे संयोजक अजमत खान यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
या पुरस्कारामुळे जालना जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शिक्षक पठाण साजिदखान नजबखान यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल त्यांचे आदर्श शिक्षक शेख जमीर सर, प्राध्यापक दत्ता देशमुख, शंभर शिक्षक क्लबचे राजेभाऊ मगर, आर आर जोशी, संदीप इंगोले, अप्पासाहेब मुळे, जगन वाघमोडे, आदींनी अभिनंदन केले आहे.


