टेंभुर्णी-कुंभारझरी रस्त्याची दुरवस्था; गुत्तेदाराच्या हलगर्जीपणाने अपघाताचा धोका, शासनाकडून निधी मंजूर तरीही काम रखडले

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते कुंभारझरी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शासनाकडून रस्ता मजबूतीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, काम घेतलेल्या गुत्तेदाराकडून जाणीवपूर्वक हलगर्जीपणा व वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप कुंभारझरी ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील नानाभाऊ चव्हाण यांनी केला आहे. टेंभुर्णी ते कुंभारझरी हा दहा किलोमीटरचा रस्ता जाफराबाद आणि भोकरदनला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. सध्या या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यामुळे त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे शालेय बस, रुग्णवाहिका, दुचाकीस्वार आणि शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात ________________________________________
उपोषणाचा इशारा “कुंभारझरी रोडवरील खड्यांत पावसाचे पाणी साचल्याने अपघात घडत आहेत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे देशमुख यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. तत्काळ खड्डे बुजवून मजबूतीकरण केले नाही, तर गावकरी उपोषणाला बसतील.” सुनील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, कुंभारझरी _ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वर्क ऑर्डर निघून सहा महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. डांबर नसल्याचे कारण देत गुत्तेदार वेळकाढूपणा करत असल्याचे सुनील चव्हाण यांनी सांगितले. गुत्तेदाराला राजकीय वरदहस्त असल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून तो काम टाळत असल्याचा आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक गजानन शेळके यांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत चिंता व्यक्त केली. पावसात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती असते, तसेच कमरेचे आणि मणक्याचे आजार वाढल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन गुत्तेदाराला तंबी द्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.


