अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
शिवनगर परिसरातील अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी व पालकांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आनंदाने सेल्फी काढून प्रवेशोत्सवाच्या आठवणी जतन केल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात “माझा प्रवेश निश्चित” असे स्टार देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शासनाकडून उपलब्ध मोफत पाठ्यपुस्तकांचेही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई येवले, सचिव श्री दिनेश येवले, मुख्याध्यापिका श्रीमती इंगळे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश दिला. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.



