pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी चे आदर्श शिक्षक शेख जमीर यांचा आदर्शवत उपक्रम, जुन्या सहकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना भेटून नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न

0 4 3 3 3 2
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.27

“ते आता काय करतात सेवानिवृत्तीनंतर?” या एकाच प्रश्नाने ४० वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा जिवंत केला आहे. राज्यपालांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आलेले टेंभुर्णीचे शेख जमीर गुरुजी यांनी आपल्या जुन्या सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन थेट छत्रपती संभाजीनगर गाठले.

तिथे मुलांकडे स्थायिक झालेल्या आणि सन १९८७-८८ मध्ये जालना जिल्हा परिषद शाळेत सोबत काम केलेल्या सेवानिवृत्त शिक्षक मधुकर जोशी गुरुजींची त्यांनी अत्यंत आपुलकीने भेट घेतली.

सेवानिवृत्तीनंतर अनेक शिक्षक शहरात मुलांकडे राहायला जातात. नोकरीतले मित्र दुरावल्यामुळे ‘आपण कोणी होतो’ याची जाणीव हळूहळू पुसट होऊ लागते. हे पोरकेपण आणि एकटेपण दूर व्हावे,

म्हणून शेख जमीर गुरुजी आवर्जून जुन्या गुरुजींना आणि मार्गदर्शकांना त्यांच्या घरी जाऊन भेटतात. “तुम्ही आता काय करता? तब्येत कशी आहे?” या साध्या प्रश्नातून जुन्या आठवणींना उजाळा देत ‘तुम्ही आजही गुरुजीच आहात’ असा धीर ते देतात.

या भेटीमध्ये नाना देशमुख गुरुजी, नवले गुरुजी यांसारखे १९८६-८७ मधील जुने सहकारी मित्रही सामील झाले होते. सर्वांनी

मिळून मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी आजचे शिक्षक आणि तत्कालीन शिक्षक या विषयावर गप्पांची मैफल चांगलीच रंगली होती. शेख जमीर गुरुजी स्वतः शांत स्वभावाचे आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. राज्यपालांनी त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान केला असला, तरी ते या सन्मानात अडकून पडले नाहीत. निवृत्तीनंतरही आपले जुने गुरुजी, सहकारी आणि मार्गदर्शक

यांना न विसरता, त्यांना भेटून जुन्या आठवणी ताज्या करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

सेवानिवृत्ती ही केवळ नोकरीतून असते, नात्यातून नाही, असाच संदेश शेख जमीर गुरुजी आपल्या या उपक्रमातून समाजाला देत आहेत. मोठं झाल्यावर ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांना कधीच विसरायचं नसतं, कारण गुरुजी निवृत्त होतो, पण त्याचे ‘गुरुजीपण’ कधीच निवृत्त होत नाही. शेख सरांचा हा उपक्रम सर्वांनाच भावून जात आहे. त्यांच्या या उपक्रमांमधून जुन्या सहकाऱ्यांना निवृत्तीनंतर एक प्रकारचा उत्साह निर्माण करण्याचा हा प्रयत्न आदर्शवत उपक्रमासारखाच आहे. या आदर्शवत उपक्रमातूनच त्यांनी एक नात्याची माळ गुंफली आहे. ते सर्वांनाच हवे हवे असे वाटत असतात आणि सर्वांनाच भेटल्यानंतर एक प्रकारचा हुरूप येतो. ते जसे शिक्षकांना भेटत असतात तसेच त्यांच्या नाट्यकलेतील सर्वच सहकाऱ्यांना नेहमीच भेटत असतात आणि त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. भाई मिया म्हणून परिचित. आपल्या नाट्यकलेतील जुन्या सहकार्यांना जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांच्या मधला मित्र जागा होतो. आणि ते आपल्या लहान भावाप्रमाणे सर्वांना महत्त्व देत असतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे