राज्यातील शिक्षकांना मतदार याद्या सखोल पुननिरिक्षण (एसआयआर) काम!
शाळा आणि विद्यार्थी वाऱ्यावर! 'एसआयआर' च्या कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे! मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6
दिनांक ०७/०७/२०२६ महाराष्ट्रात मतदार याद्या सखोल पुननिरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम सुरू आहे. त्याकामासाठी ‘मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षक त्याकामात व्यस्त असल्याने शाळा आणि विद्यार्थी वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा हा निर्णय असल्याने पालक व विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन एसआयआरच्या कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजकुमार कदम यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली आहे. मुलं शाळेत येत आहेत. आगोदरच शिक्षक संख्या पुरेशी नसल्याने जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका व खाजगी अनुदानित शाळेसमोर अनंत अडचणी आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश शिक्षकांना निवडणूक विभागाने ‘मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. कामाचे स्वरूप पहाता हे काम पूर्ण वेळ केले तरी निर्धारित तीन महिन्यांत शिक्षकांची दमछाक होणार आहे. एवढा प्रदीर्घ कालावधीत राज्यातील अध्यापन प्रक्रिया कोलमडून पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळेत शिकविण्यास प्रथम प्राधान्य देणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, ही अतिशय संतापजनक बाब आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की,मा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिक्षकांना सुटीच्या काळात करता येईल एवढेच काम देण्याचे आदेशित करण्यात आले आहे तद्वतच शिक्षण हक्क कायदा (आरटीई),2009 नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य केवळ अध्यापन करणे हेच आहे. जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील बहुतांश शिक्षक एसआयआर कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. परिणामी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच अध्ययन अध्यापन प्रक्रिया ढेपाळली आहे. अनेक शाळा बंद असल्यासारख्याच आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधे प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन मतदार याद्या सखोल पुननिरिक्षण कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, व्ही.जी.पवार,अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव,सरचिटणीस राजकुमार कदम,कोषाध्यक्ष औताडे ए. बी. उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, प्राध्यापक डॉक्टर मारुती तेदमपुरे, प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवंते, उपाध्यक्ष जगन वाघमोडे, भीमा शिंदे, दीपक शेरे ,कोषाध्यक्ष नारायण मुंडे, सदस्य तुकाराम पडघन काकड सिद्धी प्रमुख भगवान धनगे, हकीम, भागवत काकडे, विष्णू इप्पर ,कैलास मांटे ,दत्तात्रय राऊत, रवींद्र भुसारे, पटेल, तालुका अध्यक्ष रमेश गाडे, गणेश मेहेत्रे, शिवाजी कायंदे, आनंदा वाघ, सुधाकर डोईफोडे, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

