जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्र पाणी आवर्तनाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश
जालना/प्रतिनिधी,दि.26
जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य डाव्या कालव्याच्या 30 ते 118 किलोमीटरदरम्यान रब्बी हंगाम 2026-27 मधील सिंचन व बिगरसिंचन पहिले आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कालव्यातून होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुधारित वीजबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आवर्तन पूर्ण होईपर्यंत दररोज 20 तास वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यांतील संबंधित गावांना केवळ चार तास वीजपुरवठा उपलब्ध राहणार आहे.
जायकवाडी धरणातून पहिल्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागामार्फत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हे पाणी डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, मार्गातील अनधिकृत पाणीउपसा रोखून शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांनी सुधारित आदेश दिले आहेत.
लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर वेळापत्रकात बदल
यापूर्वी कालव्यालगतच्या गावांमध्ये सात दिवसांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, विधानसभा सदस्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी भारनियमनात शिथिलता देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर अधीक्षक अभियंता तथा प्रशासक, लाक्षेविप्रा, छत्रपती संभाजीनगर यांनी सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे.
अंबड तालुक्यातील गावांसाठी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत, घनसावंगी तालुका सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि परतूर तालुक्यातील गावांसाठी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चार तास वीजपुरवठा सुरु ठेवण्यात येणार आहे.
उर्वरित २० तास वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. हा आदेश चालू सिंचन पाणीपाळी पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. अंबड तालुक्यातील भांबरी, दह्याळा, चंदनापुरी खुर्द, चंदनापुरी बुद्रुक, रेणापुरी, चुर्मापुरी, पिंपळगाव सिरसगाव, शहापूर, दाढेगाव, धाकलगाव, सौंदलगाव, रामगव्हाण, नालेवाडी, डोणगाव, दोदडगाव, अंतरवाली सराटी, टाकी, वडीगोद्री, करंजळा, वडिकाळ्या, घुंगडे हादगाव, भणंग जळगाव, भार्डी, रुई, सुखापुरी, बेलगाव आणि एकलेहरा आदी गावांचा समावेश आहे.
घनसावंगी तालुक्यातील खांडवी हिवरा, बाचेगाव, भायगव्हाण, दहिगव्हाण, तीर्थपुरी, खालापुरी, मांदळा, बोडखा, खडका, खडकावाडी, लिंबोनी, सिंदखेड, पिंपरखेड, आरगडे गव्हाण, पाहोळी, कुंभार पिंपळगाव, मूर्ती, लिम्बी, भेंडाळा, पानेगाव, कोटाळा, विरगव्हाण आणि जांबसमर्थ आणि परतूर तालुक्यातील वाहेगाव, आंतरवाला, सातारा, आसनगाव, हादगाव, बाणाची वाडी, डोणवाडी, वडारवाडी, पळशी, धामणगाव, ठोकमाळ, कनकवाडी, लोणी, आष्टी, रायगव्हाण, आनंदगाव, ब्राह्मणवाडी आणि फुलवाडी या गावांचा समावेश असल्याचे कळविण्यात आले आहे.
महावितरण, पोलीस प्रशासनाला अंमलबजावणीच्या सूचना
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जालना येथील अधीक्षक अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत निर्धारित वेळापत्रकानुसार वीजपुरवठा नियंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यांतील मुख्य डाव्या कालव्याच्या परिसरात अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आवश्यकतेनुसार संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


