युनायटेड ग्लोबल फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्वयंसेवकाने रेस्क्यू ऑपरेशन करून जखमी वानरास दवाखान्यात नेले

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.29
देऊळगाव . येथील पोलीस स्टेशन परिसरात मागील तीन दिवसांपासून एक जखमी वानर वावरत असल्याचे निदर्शनास आले होते. विजेचा शॉक लागल्यामुळे त्या वानराच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेमुळे ते वानर परिसरात इकडून तिकडे भटकत होते. वानराची अवस्था लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाचे वन्यजीव रक्षक वैभव लाखोले यांना माहिती दिली. माहिती मिळताच वैभव लाखोले यांनी कोणताही विलंब न करता देऊळगाव राजा पोलीस स्टेशन परिसरात धाव घेतली. यावेळी वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. सुरुवातीला वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, जखमी असूनही ते वानर अत्यंत चपळाईने हालचाल करत असल्याने रेस्क्यू मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या. अखेर वन्यजीव रक्षक वैभव लाखोले यांनी धाडस व कौशल्य दाखवत त्या वानराला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर जखमी वानराला तातडीने जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन आवश्यक उपचार करण्यात आले. वानराची प्रकृती पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत त्याला वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात यावे व प्रकृती स्थिर झाल्यानंतरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे, अशी मागणी युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाचे वन्यजीव रक्षक वैभव लाखोले यांनी केली. दि. २८ मे रोजी पार पडलेल्या या यशस्वी रेस्क्यू मोहिमेमुळे जखमी वन्यजीवाला वेळेत मदत मिळाली असून वन विभाग, पोलीस प्रशासन आणि युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या समन्वयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




