सेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी, दि.16
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये या कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी आगामी 28 एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समारंभ पार पडणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने 1 एप्रिल 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार 28 एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्य सेवा हक्क आयोगाच्या कामाची माहिती पोहोचवणे आणि ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हापातळीवर एका खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा एक वरदान’ या विषयावर दि. 22 एप्रिल 2026 पर्यंत निबंध सादर करणे आवश्यक आहे. निबंधाची पीडीएफ dcolljalna@gmail.com या पत्त्यावर पाठवावी. तर श्री प्रल्हाद तारख, सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडे बंद लिफाफ्यात जमा करावी. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


