शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

काजळा/प्रतिनिधी, दि.27
केंद्र काजळा अंतर्गत आज, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी जि.प. प्राथमिक शाळा, घोटण येथे शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या शिक्षण परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करणे तसेच शाळेतील शैक्षणिक वातावरण समृद्ध करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख श्री. दिलीप अंभोरे यांनी प्रस्तावना व मागील महिन्यातील आढावा सत्र घेतले. त्यानंतर सर्व शिक्षकांच्या सहभागातून देवाण-घेवाण अनुभव शिक्षकांना येणाऱ्या विविध समस्या तसेच वर्ग नियोजन यावर चर्चा करण्यात आली.
घोटण गावचे सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री रामभाऊ जगताप यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालकांचा सहभाग पालक मेळावा तसेच पालकाकडून शाळेसाठी योगदान या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.श्रीमती. पापनवार मॅडम यांनी वर्ग नियोजन, आदर्श पाठ व आशयाच्या आधारे पाठाचे मासिक नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक श्री देवेंद्र बारगजे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक कसा मिळवला या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. इयत्ता नववी चा वर्ग स्थापन करण्यासाठी केलेले कार्य या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध विषयांवरील चर्चेमुळे शिक्षकांना शैक्षणिक नियोजन, अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धती, विद्यार्थी सहभाग आणि शाळा विकास याबाबत उपयुक्त दिशा मिळाली.विशेष शिक्षक श्री गिरशेट्टी यांनी समावेशित शिक्षण संदर्भात दिव्यांग विद्यार्थ्याचे सर्वेक्षण, प्रशस्त ॲप केंद्रातील सर्व शिक्षकांनी कोर्स पूर्ण करण्याबाबत, दिव्यांग विद्यार्थ्यांची यु-डायस मध्ये नोंद करणे संदर्भात तसेच 2026- 27 मध्ये दिव्यांग विद्यार्थ्याला मिळणारे लाभ मदतनीस भत्ता, वाहतूक भत्ता, प्रोत्साहन भत्ता व वाचक भत्ता तसेच Alimco मोजमाप शिबिर या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
आदर्श विद्यालय सायगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री उनवणे व प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा शाळेचे मुख्याध्यापक श्री गुजर यांनी आपण केलेल्या कामाचे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवपिंपळगाव शाळेतील शिक्षक श्री तळेकर यांनी केले.
अशाप्रकारे सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा संकल्प करत “गुणवत्ता विकास हाच आमचा ध्यास” या प्रेरणादायी भावनेने शिक्षण परिषदेचा समारोप करण्यात आला.
सर्व सहभागी शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक धन्यवाद!
आज दि.27 ऑगस्ट 2026 रोजी जि.प. प्रा.शाळा घोटण येथे शिक्षण परिषद उत्साहपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


