
0
4
7
9
9
0
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
सिडकोने नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केलेल्या द्रोणागिरी (नोड) शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता, द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध ग्रामीण गावांच्या मतदान केंद्रांमध्ये विभागलेले द्रोणागिरी नोडचे शहरी मतदार एकत्र करून संपूर्ण द्रोणागिरी शहरासाठी स्वतंत्र मतदान केंद्र व स्वतंत्र निवडणूक व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे शिवसेनेचे द्रोणागिरी प्रमुख जगजीवन भोईर यांनी केली आहे.
द्रोणागिरी नोडच्या वाढत्या लोकसंख्या मुळे मोठ्या प्रमाणात मतदार वाढल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे बोकडवीरा मतदान केंद्राची विभागणी करून द्रोणागिरीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाचे स्वागत करून द्रोणागिरी नोडची भौगोलिक, प्रशासकीय आणि शहरी रचना विचारात घेऊन त्याची व्यापक पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विविध गावांमध्ये विखुरलेला द्रोणागिरी नोड एकाच मतदान केंद्राखाली आणण्याची मागणी:-
सध्या द्रोणागिरी नोडमधील विविध सेक्टर वेगवेगळ्या मतदान केंद्रांमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे बोकडवीरा, फुन्डे, नवघर, चाणजे व नवीन शेवा या मतदान केंद्रांत असलेले द्रोणागिरी नोडचे संबंधित क्षेत्र एकत्र करून स्वतंत्र द्रोणागिरी मतदान केंद्र तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये बोकडवीरा मतदान केंद्रातील सेक्टर क्र. ३०, ४१, ४८, ५०, ५१, ५२, ५३, ५४ व ५५; फुन्डे येथील सेक्टर क्र. १५ व सेक्टर क्र. ११ भैरवी संकुल; नवघर येथील सेक्टर क्र. १२ भूपाळी व जय मल्हार संकुल; चाणजे येथील सेक्टर क्र. ५६, ५७, ६५ व ६६ तसेच नवीन शेवा मतदान केंद्रातील सिडको विकसित द्रोणागिरी क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी आहे. तसेच बोकडवीरा, भेंडखळ व फुन्डे परिसरातील MSEB वसाहतींचाही स्वतंत्रपणे मतदान केंद्र असावे असा प्रशासकीय व कायदेशीर विचार करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
द्रोणागिरीची शहरी ओळख; ग्रामीण ग्रामपंचायतींपासून स्वतंत्र व्यवस्था का नाही? :-
द्रोणागिरी हे सिडकोने नियोजित व विकसित केलेले शहरी क्षेत्र आहे. शहराचे नियोजन, बांधकाम परवानग्या, नागरी सुविधा आणि विकासाशी संबंधित व्यवस्था सिडकोच्या माध्यमातून केली जाते. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, गटारे, उद्याने, मैदाने आदी नागरी सुविधांची जबाबदारीही संबंधित सिडको म्हणजेच नगरविकास मंत्रालयाकडे आहे.
दुसरीकडे बोकडवीरा, भेंडखळ, फुन्डे, चाणजे, नवघर आणि नवीन शेवा ही स्वतंत्र ग्रामीण गावे असून त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत व्यवस्था ग्रामविकास मंत्रालया अंतर्गत (जिल्हा परिषद- पंचायत समिती) आहे.
त्यामुळे शहरी द्रोणागिरी नोड आणि ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र यांची निवडणूक रचना वास्तविक भौगोलिक व प्रशासकीय स्वरूपाशी सुसंगत असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण निवडणुकांवर शहरी मतदारांचा प्रभाव? :-
द्रोणागिरी (नोड) शहरातील रहिवाशी, बोकडवीरा, भेंडखळ, फुन्डे, चाणजे आणि नवीन शेवा त्या त्या गावांच्या ग्रामपंचायतींना घरपट्टी/ मालमत्ता कर आणि पाणीपट्टी व स्वच्छता कर भरत नाहीत.
द्रोणागिरी नोडमधील काही शहरी मतदारांची नावे सध्या आजूबाजूच्या ग्रामीण गावांच्या मतदान केंद्रांमध्ये असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शहरी आणि ग्रामीण मतदारांचे मिश्रण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
द्रोणागिरीतील मतदार संबंधित ग्रामपंचायतीच्या स्थानिक करप्रणालीत येतात का, त्यांचे वास्तविक वास्तव्य कोणत्या हद्दीत आहे आणि ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची कायदेशीर पात्रता काय आहे, याची निवडणूक प्रशासनाने स्पष्टपणे पडताळणी करावी, अशी मागणी आहे.
“मतदारांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवत, मात्र कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाला मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे, हे लागू कायदे व मतदारयादीच्या निकषांनुसारच निश्चित झाले पाहिजे,” अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
मतदारसंख्या वाढणार; आजच नियोजनाची गरज:-
द्रोणागिरी नोडमध्ये नवीन गृहप्रकल्प, इमारती आणि नागरी वसाहतींची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात मतदारसंख्येतही मोठी वाढ होणार आहे. सध्या द्रोणागिरी नोडशी संबंधित मतदारसंख्या सुमारे १,००० असल्याचा दावा करण्यात आला असून, शहराचा विस्तार पाहता ही संख्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भविष्यात पुन्हा मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेची वेळ येऊ नये, यासाठी आत्ताच स्वतंत्र आणि दीर्घकालीन निवडणूक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जेएनपीटी टाऊनशिपचा दाखला; समान निकषांची मागणी:-
जेएनपीटी टाऊनशिपमधील मतदारांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नसल्याचा दाखला देत द्रोणागिरी नोडबाबतही समान कायदेशीर निकष लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, अंतिम निर्णय संबंधित कायदे, मतदारयादी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दी आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच घेण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
सिडको कौशल्य विकास केंद्र किंवा MSEB शाळेत मतदान केंद्राची मागणी:-
द्रोणागिरी नोडच्या सर्व सेक्टरसाठी एकत्रित स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करून सिडको कौशल्य विकास केंद्र किंवा MSEB शाळेत मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे मतदारांना मतदानासाठी सुविधा मिळेल तसेच द्रोणागिरीच्या शहरी मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल.
द्रोणागिरीच्या वाढत्या शहरी स्वरूपाला अनुरूप स्वतंत्र मतदान व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय प्रशासन कितपत गांभीर्याने घेते, याकडे आता द्रोणागिरीकरांचे लक्ष लागले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
4
7
9
9
0




