टेंभुर्णी येथे इस्कॉन सेंटरच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात साजरा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19
येथील इस्कॉन सेंटरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. “हरे कृष्ण, हरे रामा” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने टेंभुर्णी शहर दुमदुमून गेले होते. या रथयात्रेमध्ये परिसरातील भाविक सहभागी होऊन भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले.भव्य रथ आणि आकर्षक सजावटमहोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रथाची सजावट करण्यात आली होती रथामध्ये भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा माता यांच्या मूर्ती विराजमान होत्या. महोत्सवाच्या सुरुवातीला इस्कॉनच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विशेष महाआरती आणि विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार रथाच्या मार्गावर सोन्याच्या झाडूने रस्ता स्वच्छ करून रथयात्रेला सुरुवात झाली.शहरातून निघाली भव्य मिरवणूकटेंभुर्णी शहरातील प्रमुख मार्गांवरून ही भव्य रथयात्रा फिरवण्यात आली. रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी आणि विविध मंडळांनी सुंदर रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून रथाचे स्वागत केले. अनेक भाविक स्वतःहून देवाचा रथ ओढण्यासाठी उत्सुक होते. रथ ओढल्याने पुण्य लाभते, या श्रद्धेने अबालवृद्धांनी दोरखंड धरून रथ पुढे नेला. मिरवणुकीत भक्तांनी केलेले पारंपारिक नृत्य आणि कीर्तन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.महाप्रसादाचे वाटपरथयात्रेच्या सांगतेनंतर इस्कॉन सेंटरच्या वतीने सर्व भाविकांसाठी संत सावता मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


