सावरगाव घाट (जि. बीड) येथील भगवान भक्तीगडावर 20 ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत भगवान बाबा यांच्या विचारांचा वारसा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी जोपासलेली मेळाव्याची परंपरा यानिमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. या मेळाव्यास राज्यभरातील समाजबांधव, वारकरी, कार्यकर्ते आणि मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जायभाये यांनी केले आहे.
संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दरवर्षी दसरा मेळाव्यानिमित्त भाविक आणि समाजबांधव एकत्र येतात. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या मेळाव्याला विशेष ओळख मिळवून दिली. यंदाही नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
‘वर्षभर कुठेही राहा, पण दसऱ्याला सावरगावला दिसा!’
दसरा मेळावा हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजबांधवांच्या एकत्रीकरणाचे आणि संत भगवान बाबांच्या विचारांचे स्मरण करण्याचे व्यासपीठ असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत राहणाऱ्या समाजबांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाश जायभाये यांनी केले.
‘आपला दसरा, आपली परंपरा; गड ऊर्जेचा, गड आशेचा चला सावरगाव घाट!’ या घोषणेतून त्यांनी समाजबांधवांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी भाविक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.