सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ महिलांना साडी वाटप

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.13
जाफराबाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून जाफराबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जाफराबाद तालुक्यातील माहोरा, कोल्हापूर,चापनेर, येवता, डोलखेडा, आरतखेडा, सावंगी, गोंधनखेडा, टेंभूर्णी, आडा भारज व परिसरातील विधवा, परित्यक्ता व गरजू महिलांना १३५ साड्या वाटप करुन सन्मान करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण महर्षी तथा सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलजी म्हस्के हे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी लढा दिला, त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केला असल्याचे दादासाहेब म्हस्के यांनी सांगितले.साडी वाटपाचा लाभ घेताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. “शिक्षण आणि संघटन यासोबतच सामाजिक मदतीचा हात पुढे करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” असे मत महाविद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल भाऊ म्हस्के यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिल वैद्य यांनी केले.तर आभार प्रा. डॉ.मनोज पगारे यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धार्थ महाविद्यालयाने राबवलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे जाफराबाद परिसरातून मोठे कौतुक होत आहे.




