
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 5
अकोला : जिल्हा क्रीडा परिषद, अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षांखालील विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत कु. वैभवी ज्ञानेश्वर फिरके हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातील मुली आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवू शकतात, हा प्रेरणादायी संदेश वैभवीने आपल्या यशातून दिला आहे. जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ग्रामीण कन्याही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, याचे वैभवीचे यश हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. सावता तिडके, श्री. विनायक खलसे, डॉ. मोठे साहेब, डॉ. अविनाश सुरूसे, श्री. धीरज काबरा,बालाजी डोमले राहुल डोमले श्री. अलकेश सोमाणी, श्री. दत्ता वाघमारे, श्री. बी. टी. धनवाई सर तसेच वैभवीचे प्रशिक्षक श्री. सोफियान सर आदींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वैभवीच्या या सुवर्णकामगिरीने तिच्या कुटुंबासह शाळेचे, गावाचे आणि संपूर्ण ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल झाले असून, तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


