सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद भोपी, लक्ष्मीकांत ठाकूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करायचं म्हटलं की, मोठ मोठाले फ्लेक्स लावणे आणि संध्याकाळी मित्रमंडळींसोबत पार्ट्या झोडणे असा जणू प्रघातच पडला आहे. मात्र यालाही काही मंडळी अपवाद आहेत. जी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक जाणिवेचे भान ठेवून समाजातल्या गोरगरीब मुलांच्या मदतीला धावून जातात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी दोन व्यक्तिमत्व म्हणजे कर्नाळा टीव्हीचे कॅमेरामन पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर आणि नांदगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रमोद भोपी. हे दोन्ही व्यक्तिमत्व आपला वाढदिवस समाजसेवी उपक्रमाने साजरा करतात. कॅमेरामन पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर आणि प्रमोद भोपी हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षे कुडावे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरजवंत मुलांना गणवेश, बेल्ट, ओळखपत्र या व्यतिरिक्त शालेय साहित्यांचं वाटप करत आले आहेत.त्यामध्ये कोणताही खंड न पडता यावर्षीही लक्ष्मीकांत ठाकूर आणि प्रमोद भोपी यांनी शुक्रवार १० जुलै रोजी, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. कुडावे राजिप शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश गायकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती भोपी, सुभाष पाटील, माजी उपसरपंच तुकाराम ठोंबरे, सावळाराम ठोंबरे, साक्षात भोपी, संतोष भोपी, हितू शिसवे, सुरेंद्र पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजिता परदेशी इत्यादी मान्यवरांसह शाळा समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी लक्ष्मीकांत ठाकूर आणि प्रमोद भोपी यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना शाळेचे मुख्याध्यापिका रंजीता परदेशी यांनी लक्ष्मीकांत ठाकूर आणि प्रमोद भोपी यांच्या परोपकारी वृत्तीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, की ज्या ज्या वेळी शाळेने कुठल्याही बाबतीत प्रमोद भोपी किंवा लक्ष्मीकांत ठाकूर यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली त्या त्यावेळी या दोघांनी शाळेच्या उत्कर्षासाठी आपलं सर्वस्व झोकून देऊन काम केले आहे. शाळेच्या प्रगतीमध्ये ग्रामस्थां बरोबरच या दोघांचाही मोलाचा वाटा आहे अशा भावना मुख्याध्यापिका रंजीता परदेशी यांनी व्यक्त केल्या.या वेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत लक्ष्मीकांत ठाकूर व प्रमोद भोपी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.



