नुसत्या घोषणा नको, पुन्हा जलसंधारणाची कामे सुरु करून मराठवाडा दुष्काळमुक्त करा! – बोरसे गुरुजींची सरकारला थेट मागणी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
जलयुक्त शिवारच्या नावाखाली शासनाने 2014 ते 2026 पर्यंत एकूण ₹15,660.75 कोटी ची तरतूद/खर्च दाखवला आहे. CAG रिपोर्ट 2020 ने याच कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लावले होते.
या एवढ्या मोठ्या खर्चानंतरही आमच्या मराठवाड्याचा दुष्काळ संपला नाही, उलट शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतोच आहे. हा चिंतेचा विषय आहे.
शेतकरी पुत्र बोरसे गुरुजी यांनी या वेळी स्पष्ट भूमिका मांडली –
“आम्हाला जुन्या भांडणात पडायचं नाही. कोणी काय केलं यापेक्षा आता काय करणार हे महत्त्वाचं आहे. आमचं सरकारला सांगणं आहे की,
हा पैसा जर नियोजनपूर्वक खर्च झाला असता तर आज मराठवाड्यात वेगळं चित्र दिसलं असतं, पण जे झालं ते झालं. आता तरी सुधारा.
नुसत्या घोषणा नकोत. पुन्हा एकदा शास्त्रोक्त पद्धतीने, तज्ञांना सोबत घेऊन, गावागावात खऱ्या गरजेची कामे सुरु करून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करा. हाच या ₹15,660 कोटींचा खरा हिशोब असेल.”
आम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करत नाही आहोत, आम्ही भविष्याचा विचार मागत आहोत. फक्त फाईलवर कामं दाखवू नका, शेतात पाणी आणून दाखवा.
आमच्या 3 मागण्या –
1. पुनरावलोकन करा: जुन्या कामांचे ऑडिट करून श्वेतपत्रिका काढा.
2. नियोजन बदला: कंत्राटदारांचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या आणि तज्ञांच्या गरजेचे नियोजन करा.
3. मराठवाडा दुष्काळमुक्त करा: नुसत्या घोषणा नको, प्रत्यक्षात पाणी अडवा, पाणी जिरवा आणि शेतकरी आत्महत्या थांबवा.




