‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.13
दिवाळी सुट्ट्यांमध्ये गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करणाऱ्या लोकपरंपरेला प्रोत्साहन देणे आणि दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती करणे, या उद्देशाने राज्यभरात ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनीषा दांडगे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या आयोजनासाठी शासनाच्या संबंधित निर्णयानुसार प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्राप्त झाली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या लोकपरंपरेला प्रोत्साहन देतानाच गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. दुर्गोत्सव साजरा करण्याबाबतची संहिता व वेळापत्रकही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच संबंधित विभाग व आस्थापनांनी ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच जिल्ह्यातील नागरिक, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, युवक आणि संबंधित घटकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त, स्वयंप्रेरित व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी: दुर्गोत्सव साजरा करण्याबाबतची संहिता, नियमावली व वेळापत्रक https://www.amrutdurgotsav.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



